प्रवासाचे क्षण
प्रवास करायचा म्हंटला की कोणाच्या अंगात उत्साह संचारतो तर काहींच्या अंगावर मात्रं काटा येतो. आता क्वचित कधीतरी प्रवास करावा लागण्याचे कारण खेदजनक असु शकते. पण बहुतेक वेळा मात्रं आपण नातलगांना/मित्रांना भेटायला, कुठल्याशा प्रसंगाला उपस्थित रहाण्यासाठी, नोकरी धंद्यानिमित्त किंवा नुसतंच भटकायला प्रवास करतो. त्यामुळे एअरपोर्टवर गेलं की सगळीकडे आनंदी वातावरण असायला हवं की नाही? पण प्रत्यक्षात मात्रं तसं अजिबातच दिसत नाही.
न्यूयॉर्कहुन न्याहारीकरून निघालेला सदु जेवणाच्या वेळेच्या आत शिकागोला पोचलेला असतो. हया प्रवासासाठी सदुने घोडागाडी किंवा आगगाडी ऐवजी विमानाचा वापर केल्याने त्याचे कितीतरी दिवस, किमान काही तास तरी नक्कीच वाचले आहेत. पण हा वेळ वाचल्याचा आनंद म्हणा किंवा कृतज्ञता म्हणा सदुच्या चेहेर्यावर कधीतरी दिसते का? सदुच काय, पण विमानातुन उतरलेली कोणतीही व्यक्ति बघा, जमिनीवर पाय पडताच अगदी सुसाट पळू लागते. जणु काय आत्ताच्या आत्ता बाहेर पडलं नाही तर हे मुक्कामाचं गावच नाहीसं होणार आहे. हातात धरलेली पुलमन बिचारी त्यांच्या मागे घरंगळत असते गरर्र्र गरर्र गरर्र आवाज करत.
बरं चालावं लागु नये म्हणून लांबच्या लांब वॉकवे म्हणजे सरकणारे पट्टे केलेले असतात. त्यावर तरी हसत खेळत शांततेने उभं रहावं की नाही? नाही, हे त्यावरूनही धावत जाणार. जणू काही तो वॉकवे कुठेतरी जमिनीच्या आत लुप्तं होणार आहे अगदी पुढच्या मिनिटाला.
बरं ह्यांच्याशी दोन शब्दं बोलावं म्हंटलं तर कानात बोळे घातलेले असतात - कापसाचे नाही, स्पिकरचे. गरम तेल ओतावं कानात तसं संगीत ओतणारे ते बोळे. समोरच्याचा आवाज बंद केला की त्याच्या अस्तित्वाची दखलही घेण्याची गरज नसते. त्यामुळी ही मंडळी निर्जन प्रदेशात एकटेच चालल्यासारखी शून्यात बघत चालत असतात.
कामकरी महिला कानात बोळे नं घालताही शुन्यात बघत चालतात. कडक इस्त्री केलेले बिझनेस फॉर्मल, इस्त्री केल्यासारखेच दिसणारे केस. चेहेर्यावर पदाच्या तोलामोलाचा मेकअपचा मुखवटा. ताठ मान, ताठ पाठ. उगाच वाकलं तर हाडबिड मोडायचं. नजर अगदी सरळ समोर. मागे धरलेल्या अगदी ताठ हातातून घासल्या जाणार्या सामानात ऑफिसच्या फायली आणि लॅपटॉप. "मी ऑफिसच्या कामाने जातेय ना? यावेळी मी आई नाही, बायको नाही आणि स्त्री तर नाहीच नाही. आत्ता मी आहे फक्त एक निर्विकार एक्झिक्युटिव्ह". उंच टाचांच्या चपलांच्या टॉक टॉक आवाजानेच त्यांना झपाटले असते बहुदा. टॉक टॉक टॉक गरर्र गरर्र गरर्र.. यंत्रवत चालणे सुरू.
अहो, सुट्टीला जात असाल किंवा कामानिमित्त जात असाल, जरा घडीभर तरी आस्वाद घ्याकी तुमच्या प्रवासाचा!
तिकडे सदुला घ्यायला येणार्याचीही अवस्था त्रिशंकुसारखी असते. पार्किंगला पैसे पडू नये म्हणुन आणि आपल्या सदूला अगदी मिनिटभरही जादा एयरपोर्टवर घालवाला लागू नये म्हणुन हा माणूस एयरपोर्टच्या प्रदक्षिणा घालत असतो.
तीन चकरा. आली का फ्लाईट? बरं अजुन चकरा मारतो.
दहा चकरा. सामान घेतलंस का? हं मं बाहेर ये, मी येतोच आणखी एक चक्कर मारून.
बरं प्रवासात कंटाळले असतील म्हणुन असे वागतात म्हणावं तर सुरूवात कशी होते पहा.
बोर्डिंग सुरू व्हायच्या आधीच गेटसमोर रांगेत उभे रहातील. अहो सीट नंबर मिळालाय ना? मग आता विमानात सर्वांच्या आधी चढलात म्हणून मुक्कामाला इतरांपेक्षा पाच दहा मिनिटं आधी पोचणार आहात की काय? आणि विशेष म्हणजे प्रवास जितका मोठा तितकी ही रांग लवकर सुरू होते. आठ-दहा तासाची फ्लाईट असली तरी त्या हवेतुन जाणार्या कोंडवाड्यात घुसायची यांना किती घाई. खरं म्हणजे बोर्डिंगच्या आधी सर्व प्रवाशांनी मिळून काही तरी व्यायाम करावा किंवा गाण्याच्या भेंड्या, मामाचं पत्रं हारवलं सारखे खेळ खेळावे. पण नाही. तिथे रांगेत उभे रहातील अर्धा अर्धा तास.
बरं आता मुक्कामाला जातील, छान निसर्गरम्य ठिकाणी. तिथे जाऊन तरी जीवाला शांतता लाभू देतील का? तो निसर्ग रम्य देखावा तासनतास नुसता डोळ्यात साठवावा, निसर्गाशी एकरूप व्हावं, अंतर्मुख व्ह्यावं. चिडीचुप राहुन पाखरांची गाणी ऐकावी. झर्यात पाय सोडावेत, एखाद्या कातळावर चढुन डुलकी घ्यावी, सुरेल सोबत असल्यास हात हातात घ्यावा. वारा प्यावा, मावळत्या सूर्याला निरोप द्यावा, उगवत्या चंद्राचे चांदणे अंगावर सोसावे. त्या प्रदेशाची जमेल तितकी माहिती काढावी, तिथल्या माणसांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यावे. त्यांचे रोजचे जीवन कसे असेल ते अनुभवावे.
छे छे तसं काही होत नाही आपल्या सदुच्या बाबतीत. सदु आणि मंडळी डोंगराच्या टोकापर्यंत जातील. तिथे उभे राहुन फोटो काढतील. तेव्हढ्यात कोणी तरी विचारतं तुमच्या सगळ्यांचा एकत्रं फोटो काढु का? हो, हो छान, धन्यवाद. झालं. पुरावा मिळाला जाऊन आल्याचा. आता पुढचा पॉंईट. आलो आहोत ना इतक्या दुरून, मग सगळं बघायला नको? कुणीच नं दिलेलं टार्गेट पूर्ण करायच असतं, ते ही यशस्वीपणे.
या दृष्यापेक्षा पुढचं दृष्य जास्तं चांगलं असेल. या क्षणापेक्षा पुढचा क्षण जास्तं चांगला असेल म्हणून हा क्षण सरायला हवा. आजच्यापेक्षा उद्या जास्तं चांगला असेल. या चांगल्या उद्यासाठी आजचे बलिदान व्हायलाच हवे का?
नोंद: ते आम्ही नव्हे.