Monday, August 18, 2008

लोकशाही व जनमानस

लोकशाही - आपल्याला सद्ध्या माहित असलेल्या राजकीय व्यवस्थेतील सर्वात यशस्वी लोकप्रिय प्रणाली. असे असले तरी ही व्यवस्था आदर्श, परिपूर्ण आहे असे म्हणता येत नाही. लोकशाहीच्या मर्यादा वेळोवेळी दिसून येतात. या मर्यादांच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मनुष्य स्वभाव.


एरवी राजकारणाशी फारसा संबंध असलेल्या अथवा नसलेल्यांवर नेता निवडीची महत्वाची जबाबदारी टाकली असते. या कर्तव्याचे पालन नागरिकांनी जागरूकतेने, सारासार विचाराने करावे अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात काय होते? अनेकदा अज्ञान, विसंगती, स्वार्थ, आकस, गैरसमज,पूर्वग्रह यातून अतिशय असंबद्ध निर्णय मतदानाच्यावेळी घेतले जातात.


सद्ध्या अमेरिकेत निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या अनुषंगाने उदाहरणादाखल अमेरिकेतील दोन महत्वपूर्ण मतदार गटांच्या वर्तणुकीचे विश्लेषण या लेखात करणार आहे.


९९% टक्के साक्षरता असलेल्या या देशात गोरे, काळे, लॅटिनो (मूळचे मेक्सिको अमेरिकेतील लोक) इतर अशी साधारण वर्गवारी होते. मूलभूत सुखसोयी प्रसार माध्यमे बहुतेक सर्वांना उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांनी सारासार विचार करून, देशापुढील प्रश्न चांगल्या रितीने सोडवू शकणारा नेता निवडावा ही अपेक्षा फारच माफक आहे. पण ती पूर्ण होत नाही हे ह्या दोन प्रातिनिधिक उदाहरणांवरून दिसून येते.


गट पहिला: ख्रिश्चन मूलतत्ववादी: (ख्रिमू)


देशासमोर कुठलेही प्रश्न असू देत. येत्या निवडणुकीत मह्त्वाचे ठरलेले मुद्दे म्हणजे वाढती बेकारी, आर्थिक मंदी, इराक युद्ध या कशा कशाशी यांना देणे घेणे नाही. यांच्या दृष्टीने महत्वाचे असे दोनच प्रश्न किंवा उद्दिष्टे आहेत. पहिले उद्दिष्ट म्हणजे अमेरिकेतील स्त्रियांचा गर्भपाताचा अधिकार काढून घेणे. या मुद्द्यावर ते स्वतःला "प्रो-लाईफ" असे म्हणून घेतात. अर्थात या तथाकथित प्रो-लाईफ लोकांना इराक मधे किंवा इतर कुठे बळी पडलेल्यांबद्दल फारशी सहानुभूती नसते. "लाईफ" हे केवळ अमेरिकन नागरिकांचंच असतं बरं का. या गटाचे दुसरे उद्दिष्टं म्हणजे समलिंगी लोकांना कुठलेही अधिकार, विषेशतः लग्न करण्याचे अधिकार मिळू नये. स्वतःची ही मते स्वतःपुरती मर्यादित नं ठेवता कायद्याच्या माध्यमातून इतर सर्वांवर लादण्याचा, समलिंगींना वैयक्तिक व सामाजिक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा या गटाचा प्रयत्नं सतत सुरू असतो. मतदान करनाता ह्या विचारांशी सहमत असणार्‍यालाच मत दिले जाते.


गट दुसरा: ज्यूईश मूलतत्ववादी (ज्यूमू)

हा गट संख्येने पहिल्या गटापेक्षा फार लहान असला तरी यांची आर्थिक ताकत फार जबरदस्त आहे. आज कुठलाही उमेदवार या गटाला नाखूष करू धजत नाही. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या ह्या गटाच्या हातात आहेत असे म्हंटले तरी अतिशयोक्ति ठरू नये. अर्थात अमेरिकेतील कट्टर ज्यू या गटात मोडतात हे सांगायला नकोच. अमेरिकेत रहायचे, इथे पैसा कमवायचा, पण निष्ठा मात्रं सदैव इस्त्राईलला वहायच्या असे यांचे वर्तन असते. पॅलेस्टिनियन लोकांच्या न्याय्य मागण्यांचे तुम्ही नुसते समर्थन जरी केले तरी ते तुम्हाला थेट हिटलरच्या पंक्तीत नेऊन बसवतील. इस्त्राईलचे अस्तित्वच धोक्यात आहे असा यांचा कायमचा, पक्का समज असतो. अमेरिकेचे हित कशात हा प्रश्न यांना पडतच नाही. इस्त्राईलला आंधळा पाठिंबा देणार्‍या उमेदवारालाच यांचे मत पडणार हे नक्की.



तर केवळ एका मुद्याला धरून बसलेले हे प्रातिनिधिक गट. असे इतरही काही गट आहेत. सद्ध्या बोराक ओबामा यांची बरीच हवा आहे. तरूण ओबामांमधे करिष्मा आहे, तडफ आहे, हमखास गर्दी खेचण्याची ताकद आहे. समर्थकांकडून प्रचार मोहिमेसाठी ते विक्रमी पैसाही उभा करू शकले आहेत. अशा रितीने लोकांना प्रेरित करणारा नेता बर्‍या वर्षांनी अमेरिकेला मिळाला आहे असे म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. या उलट प्रतिस्पर्धी जॉन मकेन हे अजिबात करिष्मा नसलेले तापट ढुढ्ढाचार्य आहेत. असे असले तरी ओबामांचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर नाही, तो या अशा गटांमुळे. विद्यमान अध्यक्षा बुश यांना दुसर्‍यावेळी अनपेक्षित विजय मिळवून देण्यामागे या दोन गटांचाच हात होता हे विसरून चालणार नाही. गर्भपाताविषयी ओबामांच्या उघड भूमिकेमुळे ख्रिमू अगदी त्यांच्या विरुद्ध आहेत. अर्थात जॉन मकेनही या मुद्द्यावर संदिग्ध आहेत हीच ओबामांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल.

ओबामांचे इस्त्राईल धोरण संदिग्ध आहे. शिवाय ईराणशी बोलणी करण्याचा त्यांचा मानस त्यांनी आधीच जाहीर केला आहे, त्यामुळे ज्यूमू त्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता आहे. अर्थात ओबामांच्या विरोधात जसे हे दोन प्रातिनिधिक गट आहेत तसेच त्यांच्या समर्थक गटांमधेही असे काही एखादे विशिष्टं उद्देश असणारे गट उदा. प्रो चॉईस, प्रो गे गट आहेतच. अशा परस्पर विरोधी गटांमुळे त्यातल्या त्यात संतुलन राखले जाते हे ही खरेच.


तात्पर्य: लोकशाहीच्या समर्थकांनी या व्यवस्थेला आदर्श समजून स्वस्थ बसू नये. सद्ध्या अस्तित्वात असलेल्या पर्यायांपैकी त्यातल्या त्यात चांगला पर्याय, किंवा आदर्श पर्यायाकडे जाण्याची पहिली पायरी असे म्हणावे फार तर. याहून अधिक चांगली राज्यव्यवस्था पुढच्या टप्प्यात निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्नं सुरू ठेवायला हवेत.