Tuesday, June 24, 2008

साहित्य संमेलानात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी

मराठी साहित्य संमेलन बे एरियात घ्यायचा निर्णय संमत झाला आहे. त्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याने माध्यमांना नवा खुराक मिळाला आहे.
या गदारोळात खालील सूचना कराव्याशा वाटतात:
१. साहित्य संमेलनाने मराठी ब्लॉग विश्वाची दखल घ्यावी. मराठी ब्लॉग्ज अद्याप म्हणावे तितके परिपक्व झालेले नसले तरी विविध विषयांवरील उत्तम लेखनही इथे वाचायला मिळते हे ही खरेच. हे महत्वपूर्ण माध्यम साहित्य संमेलनात वगळले जाऊ नये असे वाटते. मराठी लेखकांनी या माध्यमाचा स्वीकार करून त्याला अधिक सशक्त करायला हवे. त्यासाठी मुळात आधी त्यांची या माध्यमाशी ओळख होणे हे फार गरजेचे आहे. आज एकाही प्रमुख मराठी साहित्यिकाचा स्वतःचा असा ब्लॉग नाही. त्यांचे साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळते ते इतरांनी प्रसिद्ध केले म्हणून. लेखक आणि हे माध्यम यातील डिजीटल डिव्हाईड कमी व्हायला हवा. त्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत असे वाटते.
२. साहित्य संमेलनात तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक लोकांना त्यात सहभागी करून घ्यावे. मराठी साहित्य परिषदेचा स्वतःचा ब्लॉग असावा. त्यात संमेलनाविषयी अद्ययावात,उपयुक्त माहिती उपल्ब्ध करून द्यावी. लाइव्ह टेलिकास्ट पूर्वी केले गेले आहे की नाही हे मला माहित नाही.पण लाईव्ह टेलिकास्ट तसेच दूरसंचार माध्यमांच्या मदतीने जगभरातील साहित्यप्रेमींना प्रत्यक्ष सहभागी करून घ्यावे.

यासंबंधी कोणाशी संपर्क साधावा हे माहित नसल्याने ब्लॉगवर ही पोस्ट टाकत आहे. आपल्याला याविषयी काय वाटते? कृपया इथे प्रतिक्रिया द्या किंवा तुमच्या स्वतःच्या ब्लॉगवर लिहा.