Wednesday, February 27, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग चारआईस्क्रिमचे पर्याय:दुधाच्या पर्यायांहुनही जास्त प्रकारची व्हिगन आईसक्रिमं उपलब्ध आहेत.ही फक्तं काही उदाहरणे:


या शिवाय स्मुदी, जिलाटो, सोरबे, थंड दही यांचेही प्रकार पुष्कळ उपलब्ध आहेत:बिस्किट (कुकीज) व कन्फेक्शनरीचे प्रकार:

हे पर्यायही दिवसागणिक वाढतच आहेत. काही उदाहरणे:


चॉकलेटचे पर्याय:

शुद्ध चॉकलेट खरं तर व्हिगनच असतं. खिशाला परवडावं म्हणुन दुध आणि साखरेची 'भेसळ' केली जाते. व्हिगन चॉकलेटसही डार्क चॉकलेटच्या रूपात उपलब्ध आहेत. चव जीभेवर रूळायला वेळ लागतो, पण एकदा गडद चवीची सवय झाली की साधी चॉकलेटं आवडेनाशी होतात. बहुतेक चांगल्या कंपन्यांची काही चॉकलेटस तरी व्हिगन असतात. मिल्क चॉकलेट असे लिहिलेले नसेल तर सहसा व्हिगन असते, पण लेबल बघुन सहज खात्री करून घेता येते.काही पर्याय:
शिवाय दिलीपची चॉकलेट बक्लावा पाककृती इथे पहा:
http://www.dilip.info/baklava.htmlSunday, February 24, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग तीन

ह्या मालिकेला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
व्हिगन या शब्दाला वन्यज असा शब्द मी भाग एक मधे सुचवला होता.
एटम यांनी हरिताहार हा शब्द सुचवला असला तरी हा शब्द फक्त आहारापुरताच आहे त्यातुन जिवनशैली प्रतित होत नाही. हरेकृष्णाजींनी त्यांच्या भाषा विशारद स्नेह्यांचा सल्ला विचारला, त्यानुसार वन्यज हा शब्दच योग्य आहे.
प्रशांत यांनी विरोपाद्वारे हरितज हा शब्द सुचवला आहे. तसेच वजन्य हा थोडा फेरफार केलेला पर्याय मला सुचला आहे. एटम यांनी व्हिगन हाच शब्द जसाच्या तसा मराठीत वापरायला हरकत नाही असे (अप्रकाशित प्रतिसादाद्वारे) सुचवले आहे. हरितज हा शब्द मलाही आवडला आहे. अर्थात दोन -तीन प्रतिशब्द असायलाही काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा.
अश्विनीने पोलेंटा, स्ट्रॉंबोली,कुसकुस,सैटान,राईसब्रान, एक्स्ट्रा वर्जिन ऑलोव्ह ऑइल, काळे तांदुळ, हातसडीचे तांदुळ व एव्होकॅडो या विषयी अधिक माहिती विचारली आहे. ती पुढील भागांमधुन प्रकाशित करेन.
एका वाचकांनी विरोपाद्वारे ही एक नविन पाककृती पाठवली आहे. ती कशी वाटली ते कळवा. वाचकाच्या इच्छेनुसार त्यांचे नाव प्रसिद्ध केलेले नाही.

पौष्टिक उसळ
साहित्य:सर्व प्रकारच्या डाळी (प्रत्येकी एक मूठ), पाणी (डाळी भिजवायला), तेल १-२ डाव, तिखट, मीठ, हळद, हिंग, जिरे, मोहरी, दोन हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, आलं (एक चहाचा चमचाभर किसून), कांदा (बारीक चिरून), कोथिंबीर (चिरून)
कृती:सर्व डाळी अर्धवट शिजवून घेणे. (साधारणपणे दाताने सहज चावता येतील पण बोटाने दाबल्यास पीट होणार नाहीत इतपत शिजवाव्या.) मायक्रोवेव असल्यास पाण्यात भिजवून ३-७ मिनिटे (डाळीच्याप्रकारानुसार) मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यास अर्धवट शिजतात. चण्याच्या डाळीला शिजायला जास्त वेळ लागतो, मसूर डाळ खूप लवकर शिजते, त्यामुळे आवश्यक असल्यास डाळी स्वतंत्र शिजवाव्या. नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईत तेल मध्यम आचेवर गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची, कढिपत्ता, आलं टाकून थोडं हलवावं. नंतर कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतावा. त्यानंतर हळद, हिंग घालावे व अर्धवट शिजवलेल्या सर्व डाळी घालाव्यात. थोडं परतल्यावर चवीनुसार मीठ व तिखट घालावे. व थोडं पाणी शिंपडून अर्धी कोथींबीर घालावी. मंद आचेवर २ मिनिटात एक वाफ आली की कढई स्टोव्हवरून उतरवावी व उरलेली कोथींबीर घालावी.ही उसळ गरम गरम खायला चांगली लागते.
टीप:
१. सर्व डाळी पौष्टिक असल्या, तरी त्या पचणं तितकच महत्त्वाचं आहे. पचनाच्या व पौष्टिकतेच्या दृषिने उतरता क्रम मूग, उडीद, तूर, चणे, मसूर, असा आहे. त्यात राजमा, वाटाणे यांची भर घालता येईल. पचनशक्तीनुसार व आवडीनुसार डाळींचं प्रमाण बदलावे.
२. आवडत असल्यास खोबर्‍याचा कीस (किंवा खवलेला नारळ), शेंगदाणे, घालावे. मस्त चव येते. दाणे घालायचे असल्यास उकडून घ्यावे.
३. ही उसळ रेफ़्रीजरेटरमध्ये आठवडाभर तिकते. त्यामुळे जास्त प्रमाणात करून ठेवता येते.
४. याच उसळीत पाणी घालुन शिजवल्यास मिश्र डाळींच वरण तयार होईल. त्यात चिंच, गूळ घालून लज्जत वाढवता येईल. (परदेशात राहणार्‍या स्वयंपाक करावा लागणार्‍या पुरुषांना हे अत्यंत सोयीचं आहे.)५. या उसळीत चिवडा, कॉर्नफ़्लेक्स, कछ कांदा, चाट मसाला घालून 'भेळ'सदृश चटपटीत पदार्थ बनवता येतो.
६.शेंगदाण्याऐवजी बदामाचे काप, मनुका वगैरे सुका मेवा घाता येईल (भारतातील टी.व्ही.वरील पाकक्रियांचे कार्यक्रम स्टाईल :) )

Thursday, February 14, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग दोन

दुधाचे पर्याय:

सोया, तांदुळ, बदाम, ओट, हेझलनट व हेम्प पासुन बनवलेली दुधे सद्ध्या अमेरिकेत उपलब्ध आहेत.


(म्हंटलं नव्हतं पर्याय वाढतात म्हणुन?) वरील बरीच दुधे घरी बनवता येतात.

चहा कॉफीत घालण्यासाठी सोया दुधाचे क्रिमर मिळते.
केकमधे किंवा बेकिंग करायच्या इतर पाककृतींमधे सोया किंवा नारळाचे दुध घालता येते.
तुप,लोण्याचे पर्याय:
मार्जरिन या प्रकारात मोडणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात सॅचुरेटेड फॅट असलेले उत्पादन टाळावे. कधी कधी दाण्याचे तुप, बदामाचे तुप हे पर्याय ठरू शकतात, पदार्थावर अवलंबुन आहे. गुळाच्या पोळीबरोबर बदामाचे तुप चांगले लागते.
कसंकायची शिफारस: अर्थ बॅलन्स
चीजचे पर्याय:

चीज हा प्रोसेस्ड पदार्थ असल्याने अजिबात खाऊच नये हा कसंकायचा सल्ला आहे.
चीज शिवाय उत्कृष्ट पिझ्झा तयार होऊ शकतो. टॉमॅटो सॉस, मशृमचे तेल, चीज नं घालता केलेले पेस्टो सॉस हे पर्याय. ऒर्डर करतानाच चीज नको असं सांगता येतं.
अगदीच रहावत नसेल तर मात्रं सोयापासुन बनवलेली अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.
पॅन्जिया नावाचे ऑन लाईन व्हिगन दुकान आहे. त्यात बरीच उत्पादने उपलब्ध आहेत.

कसंकायची शिफारस:

पॅन्जियात मिळणारे शीस व्हिगन चीज
अंड्याचे पर्याय:

बेकिंग करताना अंड्याचा उपयोग जर आर्दता वाढण्यासाठी केला असेल तर त्याऐवजी सफरचंदाचे सॉस घालता येते. फुलण्यासाठी अंड वापरलं असेल तर एनरजी एग रिप्लेसर वापरा:
टीप:

१. या लेखातील छायाचित्रे त्या त्या उत्पादनांच्या संकेतस्थळांवरून घेतली आहेत. वस्तु कशी दिसते ते कळले की घेणे सोयीचे होईल हा एकमेव उद्देश आहे. कुठल्याही उत्पादनांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. या किंवा इतर लेखांमधुन कसंकायला कुठलाही आर्थिक लाभ होत नाही.

२. विशिष्टं पाककृतींविषयीचे प्रश्न मिंटसकिंवा दिलीपयांना विचारल्यास जास्तं चांगलं.

क्रमशः
Wednesday, February 13, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग एक.

पर्यावरण, नैतिकता व आरोग्याच्या दृष्टिने प्राणिजन्य पदार्थ कमी वापरा असे सांगणारे लेख सातत्याने या ब्लॉगवर मी प्रकाशित केले आहेत. वाचकांचा प्रतिसादही चांगलाच मिळाला आहे. याविषयीची वैचारिक भुमिका मांडणे यापुढेही सुरूच ठेवणार आहे. वाचकांनी हे विचार आचरणात कसे आणायचे याबद्दल अधिक माहिती विचारली असल्याने ही नविन मालिका सुरू केली आहे.


पहिली पायरी म्हणजे व्हिगन या शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधुन काढणे. वनस्पतीजन्य या शब्दापासुन वन्यज हा शब्द सुचला आहे. (अधिक चांगला शब्द सुचवा.)
व्याख्या: वन्यज जिवनपद्धती
आहार व वापरात प्राणिजन्य पदार्थ टाळण्याचा प्रयत्नं करणारी जीवनपद्धती म्हणजे वन्यज जीवनपद्धती.
ही जीवनपद्धती आचरण्यामागे पर्यावरणाचे रक्षण, प्राण्यांविषयी सहानुभुती व आरोग्य संवर्धन तसेच विविध चविष्टं खाद्य पदार्थांचा आस्वाद घेणे ह्यापैकी काही वा सर्व हेतु असु शकतात.
ह्या विषयी प्रकाशित केलेले सर्व लेख
इथे वाचा.
वन्यज जीवनपद्धतीमुळे खाण्याचे पर्याय कमी होतील अशी भिती सुरवातीला वाटते. कारण बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंमधे वन्यज पदार्थ कमी असतात. पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे ज्या प्राण्यांचे दुध,अंडी किंवा मांस आपण खाण्यायोग्य समजतो असे प्राणी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. त्यात माशांची भर घातल्यास फार तर दोन्ही हाता पायांची बोटे वापरावी लागतील. (चु,भु,दे.घे.) आता डाळी, धान्ये, कडधान्ये, भाज्या, पालेभाज्या, फळे, शेंगा, सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ यांच्या जाती मोजुन पहा. शेकड्यांच्या वर जातात. (नुसत्या चहाचे पन्नास एक तरी प्रकार आहेत.) मग हे शेकडो पर्याय उपलब्ध असताना डझन दोन डझन नाही म्हणुन काय इतकं घाबरायचं? आभाळ छोटं छोटं करून घेतलेल्यांना मोकळ्या आभाळाची कल्पनाही करवत नाही तसं काहीसं आहे हे.

लोकांना जे हवे असते ते बाजारात उपलब्ध होते. इथे अमेरिकेतल्या बहुतेक किराणा दुकानात वन्यज दुध, तयार पदार्थ, इतकंच काय सोयापासुन तयार केलेले वन्यज मांसही मिळु लागले आहे. रेस्टॉरेंटसमधे व्हिजिटेरियन व्हिगन डिशेस उपलब्ध होत आहेत. मागणी तयार झाली की पुरवठा आपोआपच होऊ लागतो.

मी स्वतः स्वयंपाकात कच्चे लिंबु असल्याने पाकशास्त्राचे फारसे सल्ले फार देऊ शकत नाही. म्हणुन या कामात मदत करण्यासाठी मींट्सला विनंती केली आहे. वदनी कवळ घेता या ब्लॉगवर व्हिगन पाकशास्त्रावर सुगरणीचा सल्ला द्यायचा प्रयत्नं मिंटस करणार आहे. (धन्यवाद मिंटस!)

पुढच्या लेखात दुधाच्या पर्यायांची माहिती. तोपर्यंत वन्यज खाद्यपदार्थांचे हे दोन महत्वपूर्ण ब्लॉग्ज वाचा (म्हणजे नीट वाचा)
१. गेल्या तीन साडेतीन वर्षात बायकोला रोज रात्री वन्यज जेवण, तेही एकदाही पुनरावृत्ती नं करता खाऊ घालणार्‍या रसोयाचा ब्लॉग इथे बघा:
http://dilipdinner.blogspot.com/
२. लेकाला निरनिराळे वन्यज पदार्थ डब्यात बांधुन देणार्‍या आईचा ब्लॉग इथे बघा:
http://veganlunchbox.blogspot.com/ (हल्ली ही बाई स्वतःचे पुस्तक विकण्याच्या नादात आहे, पण जुन्या पोस्टस चांगल्या आहेत.)


क्रमशः

Tuesday, February 05, 2008

लोकनृत्य

डोसीडो, स्विंग युवर पार्टनर, लेडिज चेन, एलमॅन लेफ्ट, सर्कल राईट, जिप्सी मेल्ट डाऊन.....

हिवाळ्याच्या दिवसात व्यायाम करण्याचे पर्याय कमी. बाहेर बर्फ पडलेले असताना सायकल चालवणे,चालणे,धावणे जरा जीवावरच येते. जिम एके जिम करूनही कंटाळा येतो.अशा वेळी डान्स करण्याने चार भिंतींच्या आत राहुन व्यायाम आणि करमणुक दोन्ही साधले जाऊ शकते. पण क्लब,पब,रेस्टॉरेंटसमधील धुरकट, कर्कश्शं वातावरण नको वाटत असेल तर लोकनृत्य हा एक चांगला पर्याय आहे.


महाराष्ट्राचा स्वतःचा सामुहिक/लोकनृत्य असा काही प्रकार नाही. कोळीनृत्य, आदिवासी नृत्य असली तरी ती मर्यादितच आहेत. आपल्या इथल्या शास्त्रिय किंवा लोकनर्तकांना सहसा इतर राज्यातल्या नृत्य प्रकारांकडेच वळावे लागते. नवरात्रीच्या निमित्त्याने मराठी तरूण तरूणी हिरीरीने गरब्यात सहभागी होतात ते याच कारणासाठी.

आपल्या संस्कृतीत स्त्री-पुरूषांनी एकत्रं येऊन नृत्य करणे हेच खुप झाले. एकमेकांना प्रत्यक्ष स्पर्ष नं करता टिपर्‍यांचा वापर होतो. युरोप, रशियामधे विविध प्रकारची लोकनृत्ये आहेत. तिथे स्पर्शाचा बाऊ नसल्याने हालचालींमधे मोकळेपणा व वैविध्य असते. तर अशी ही विविध लोकनृत्ये युरोपातुन अमेरिकेत आली हे सांगणे नं लगे.

गावागावात कॉंन्ट्रा डान्स, स्क्वेअर डान्स अशा सारख्या नृत्यांचे आयोजन होते. खेळीमेळीचे वातावरण, लहानापासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग व लोकसंगीताचा साज. सोप्या स्टेप्समुळे फार चांगलं नाचता आलंच पाहिजे अशीही अट नाही. सहसा अर्धा तास आधी बेसिक स्टेप शिकवण्याचा क्लास असतो. बरोबर पार्टनर आणलाच पाहिजे किंवा मुलगा-मुलगीच पार्टनर असले पाहिजे असे ही काही नाही.

उदाहरणार्थ कॉन्ट्रा डान्सची ही व्हिडिओ पहा: