Wednesday, January 23, 2008

देवमासा

व्हेल मासे. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आकाराचे प्राणी. समुद्रात रहातात म्हणुन मासे म्हणायचं. एरवी इतर माशांपेक्षा जवळीक जास्तं आपल्याशीच आहे. तासनतास पाण्याखाली राहु शकतात,पण श्वास मात्रं हवेतच घेऊ शकतात. अंडी देत नाहीत माशांसारखे. पिल्लांना जन्मं देतात माणसांसारखेच. हुशार,संवेदनक्षम,अनुभवातुन शिकणारे आणि आठवणीचे पक्के!
१८३० चा सुमार. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्वेला इडन येथे किया नदीचे मुख. डेव्हिडसन कुटंबाची दोन घरे - मुख्य वस्तीपासुन दूर, जराशी एकटच. किलर व्हेल किंवा ऑर्निसियस ओर्का जातीच्या व्हेल माशांचा एक छोटा समुह शंभर एक मैल पोहुन इथे आलाय. समुद्रातुन ते चक्कं नदीच्या मुखात घुसतात. डेव्हिडसन कुटुंबांची घरे जवळ येताच जोरजोरात पाण्यावर शेपट्या मारून आवाज करू लागतात. तो आवाज ऐकुन घरातील माणसांची लगबग सुरू होते. वल्हवायच्या बोटी बाहेर निघतात. ८-१० जणांनी वल्हवायची एक बोट अशा दोन-तीन बोटी मोहिमेवर निघतात. किर्र अंधारी रात्रं. ओर्कांच्या चमकत्या शेपट्यांचा काय तो प्रकाश. बोटी त्या प्रकाशाच्या मागे जाऊ लागतात.खोल समुद्रात ओर्कांचा मोठा समुह या सर्वांची वाट पहात असतो. त्यांनीच खबर्‍या माशांना नदीवर पाठवले असते. खबर्‍यांचे आगमन काय सांगते? "ओर्निसियस ओर्कांनी बलिन व्हेल्सच्या शिकारीचे आयोजन केलं आहे. लवकरात लवकर मोहिमेवर या!!"
मोहिमेची आखणी आधीच झालेली असते. सावजाला कसे गाठायचे,कसे खिंडीत पकडायचे हे ठरवायचे काम ओर्कांचे. सावज समोर दिसले की माणसांनी भाल्यांनी बलिन व्हेल्सवर हल्ला करायचा. सावज मेले की माणसांनी त्याला समुद्रातच गळाला बांधुन ठेवायचे आणि घरी परतायचे. कारण शिकारीवर पहिला हक्कं ओर्कांचा. बलिनची जीभ आणि ओठ एव्ह्ढंच खाण्यात ओर्कांना रस. बाकीचा टाकाऊ भाग माणसांसाठी. दुसरे दिवशी माणसं पुन्हा येणार आणि उरलेलं सावज घेऊन घरी जाणार.
डेव्हिड्सन कुटंबातल्या तीन पिढ्यांनी ही मैत्री टिकवली व वाढवली. जखमी माणसांना संरक्षण द्यायला ओर्कांनी गोल रिंगण धरायचे. ओर्का कुठे दोरीबिरीत अडकले की माणसांनी सोडवायचे. समुद्रातील इतर वल्ह्यांमधुन डेव्हिडसन कुटंबाची वल्ही ओर्कांना सहज ओळखता येत.
एकदा डेव्हिडसन कुटंबातील एक सदस्य आपल्या लहान मुलांना घेऊन शिकारीवर आला. अपघात होऊन बोट उलटली. लहान मुलांचे देह सापडले, पण शिकार्‍याचा मृतदेह मात्रं सापडला नाही. दुसरे दिवशी ओर्कांनी मृतदेहाचा माग काढुन तिकडे माणसांचे लक्ष वेधले.
दरम्यानच्या काळात आधुनिक बोटी आणि तोफखान्यांनी व्हेल्सची शिकार करायचे तंत्र विकसित होऊ लागले. डेव्हिडसन कुटंबाने मात्रं अधिक हाव नं धरता आपल्या मित्रांबरोबरची पारंपारिक शिकारच सुरू ठेवली. ओर्कांनी जितके व्हेल मारले, त्यावरच कुटंबानी समाधान मानले.
१९०० साली बाहेरील एका व्यक्तिने समुद्र किनार्‍यावर पहुडलेल्या एका ओर्काला सुर्‍याने मारले. त्यानंतर ओर्कांनी किनारा सोडला. त्यावेळी समुहाची सदस्य संख्या १५ च्या वर होती. पुढच्या वर्षी त्यातील फक्तं सहाच परतले. त्या घटनेने कळपाचे विभाजन झाले असे मानले जाते.परत आलेल्या ओर्कांपैकी टॉम नावाचा ओर्का सर्वात जास्तं जगला. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्याचे निधन झाले आणि त्याबरोबर एका कथेचा अंत झाला.

** परवा रॅलेमधे न्युस रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमधे "किलर्स ऑफ इडन" हा सत्य घटनेवरील माहितीपट बघितला. (स्टोरी सांगितल्याबद्दल क्षमस्व!!) अधिक माहिती:
http://www.killersofeden.com/

** माणुस आणि निसर्ग यांच्यातल्या सुदृढ परस्परावलंबनाचे (symbiotic relationship) हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण. गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे "earth has enough to satisfy everybody's need but not anybody's greed."

** इतर शिकार्‍यांनी मात्रं रोगट परस्परावलंबन (Unsymbiotic relationship) कायम केले. त्याचा परिणाम म्हणजे सर्वच १९५० च्या सुमारास सर्वच जातीच्या व्हेल्सची संख्या इतकी कमी झाली की त्यांच्या संरक्षणासाठी कायदे करावे लागले.

** आंतरराष्ट्रिय दबावाला नं जुमानता जपान आणि नॉर्वे हे दोन देश अजुनही व्हेल्सची शिकार करतात. शास्त्रिय संशोधनाच्या गोंडस नावाखाली कायद्यांमधुन पळवाटा काढल्या आहेत. जपानी रेस्टॉरेंटसमधुन संरक्षित जातीच्या तसेच इतरही व्हेल्सचे मांस सर्रास विकले जाते त्यावरून मोहिमा शास्त्रिय संशोधनापुरत्याच मर्यादित नाहीत हे सिद्ध होते.

**जपानी सरकारच्या आशिर्वादाने चाललेल्या शिकारी मोहिमा व त्यांना विरोध करण्यासाठी
ग्रीन पिससी शेफर्ड्सच्या मोहिमा दरवर्षी निघतात. बर्फाळ, खोल अंटार्क्टिक समुद्रात दरवर्षी हे नाट्य घडते. यंदाच्या संघर्षाला तोंड फुटले आहे. दोन्ही संकेतस्थळांवर त्याची माहिती वाचा.

Wednesday, January 16, 2008

पॉलिटिकल करेक्टनेस(आणि अखेर राजेंद्रभाऊ वदले)

(अजिबात ऍब्स्ट्रॅक्ट नाही)
"दिवसातुन पाच वेळा भाज्या आणि फळे खा. जेवणात कडधान्याचे प्रमाण वाढवा" असे काहीसे लिहीलेला भला मोठा फलक आणि त्याच्या खाली एक मोठ्ठी फळांची परडी परवा आमच्या व्यायामशाळेत दिसली. ते बघताच आम्ही दोघेही गालातल्या गालात हसलो.
हल्ली अशी वाक्ये जिकडे तिकडे बघायला, ऐकायला मिळतात.
आहार, आरोग्याच्या बाबतीत नागरिकांचे हितसंबंध जपण्यासाठी विविध सरकारी खाती असतात. इथे अमेरिकेत डिपार्टमेंट ऑफ फुड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन, डिपार्टमेंट ऑफ ह्युमन सर्व्हिसेस अशा सारखी खाती आहेत. त्याशिवाय अमेरिकन कॅन्सर सोसायटी, अमेरिकन डायटेटिक असोशियन, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन अशा सारख्या स्वायत्त संस्था आहेत. या संस्थांचे काम सरकारी अनुदान तसेच खासगी देणग्यांमधुन चालते.
अशा संस्थांमधुन बाहेर पडणारी माहिती खरी असणे जितके महत्वाचे असते तितकीच ती माहिती राजकिय आणि सामाजिक मान्यते्ला अनुसरणारी - इंग्रजीत ज्याला पॉलिटिकली करेक्ट म्हणतात तशी असावी लागते. या संस्था प्राणिहक्कांच्या किंवा पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातुन भुमिका घेतील ही अपेक्षाही नाही व उद्दिष्टं ही नाही. नागरिकांच्या नैतिक विचारसरणीवर भाष्य करणे ही या संस्थांची जबाबदारी नाही. भारतिय आहारात गायी म्हशींचे दुध आवश्यक समजले जाते तसेच अमेरिकन आहारात गायींचे,डुकराचे अथवा कोंबडीचे मांस हे आवश्यक समजले जाते. कुत्र्या मांजरांचे दुध काढणे किंवा त्यांना खाणे हे या दोन्ही देशात अनैतिक/निषिद्ध समजले जाते. अशा प्रकारच्या प्रचलित नैतिक संवेदनांना तडा जाऊ नये ही काळजी मात्रं ह्या संस्थांना घ्यावी लागते.

या पार्श्वभुमीवर गेल्या दशकापासुन प्रचलित आहार व सवयींचे अनेक तोटे संशोधनातुन मोठ्या प्रमाणावर दिसुन आलेले आहेत. विशेषतः आहारातील प्राणिजन्य पदार्थ व रिफाईंड पदार्थ प्रकृतीला अपायकारक असल्याचे निष्कर्ष निघत आहेत. आता मैदा, साखर,मीठ,रिफांईंड तेल खाऊ नका असं सांगितल्यानी व्हेजिटेरियन लोकांच्या भावना बिवना काही दुखत नाहीत. पण दुध,मांस खाऊ नका हे जनतेला स्पष्टपणे सांगणे तितकेसे सोपे नाही.

का?

प्राणिजन्य पदार्थांचा व्यापार हा अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. कोट्यावधी लोकांना त्यातुन रोजगार मिळतो. सरकारवर प्रभाव टाकणार्‍या मोठ्या व्यापारी लॉबीज अस्तित्वात आहेतच. त्याच्याविरुद्ध कसे दंड ठोकायचे? मोठ्ठे देणगीदार नाराज झाले तर काय करायचे? उघड उघड बोलल्यास सरकारी अनुदानही बंद होण्याची पाळी येईल. रूढी, परंपरांचे काय करायचे? बरं पॉलिटिकली करेक्ट असल्याशिवाय प्रमुख प्रसार माध्यमे माहिती प्रसिद्ध करणारही नाहीत. बर्गरच्या, दुधाच्या, आईस्क्रिमच्या जाहिराती बंद झाल्या तर? थोडक्यात,"व्हिगन" "व्हेजिटेरियन" हे शब्द सद्ध्या तरी पचण्यासारखे (no pun intended) नाहीत.


मग काय करायचे?
या परिस्थितीतुन मार्ग काढायची एक युक्ति निघाली आहे. काय खाऊ नका हे सांगण्यापेक्षा काय खा हे सांगितले तर? दिवसातुन पाच वेळा फळे आणि भाज्या खा, चार वेळा कडधान्ये खा अशा सारखी वाक्ये सांगायची नामी युक्ति कोणाच्या तरी डोक्यातुन निघालेली दिसुन येते आहे.


समझनेवाले को इशारा काफी है."eat five servings of fruit and vegetables each day " किंवा "The evidence is compelling that a diet rich in whole grain foods has a protective effect against several forms of cancer and heart disease" अशा सारखी वाक्ये खरं म्हणजे "Be a vegan" किंवा "eat less meat and dairy" अशी सुधारून वाचावीत.

योगायोगाने हा लेख प्रकाशित करणार, तेव्हढ्यात पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक विजेते आपले राजेंद्रभाऊ पचौरी काल पॅरिस येथे वदते झाल्याची बातमी आली. "मांसाहार कमी करा, सायकल चालवा आणि उगाचच्या उगाच वस्तु घेऊ नका" - इति पचौरी. संपूर्ण बातमी इथे वाचा. मुख्य म्हणजे पूर्वी असे काही एक म्हणण्याची IPCC ची टाप नव्हती असेही त्यांनीच कबुल केले आहे.

अखेर तथाकथित पर्यावरणतज्ञ थोडं थोडं खरं खरं बोलु लागले आहेत म्हणायचे. अल गोर हे अमेरिकन असल्याने मांस खाऊ नका असं म्हणु शकत नाहीत. कित्ती इन्कंव्हिनियंट!! (आणि ते म्हंटल्याशिवायही त्यांना पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक मिळु शकते. कित्ती कन्व्हिनियंट!) तसेच आपले राजेंद्रभाऊ भारतिय असल्याने दुध पिऊ नका असेही म्हणु शकत नाहीत.

कसंकाय मात्रं तुम्हाला जे आहे ते अगदी खर्र खर्र सांगणार:

पर्यावरणाच्या दृष्टिने दुधाचे उत्पादन व मांसाचे उत्पादन यात काही एक फरक नाही.

नैतिकतेच्या दृष्टिने, आधुनिक डेअरीमधे दुध उत्पादन प्रक्रिया इतकी क्रूर झाली आहे की गायींचे मांस खाणे दुध पिण्याहुन कमी हिंसक बनले आहे. उत्पादन प्रक्रियेमधे अमुलाग्र बदल झाला असताना आपण भारतिय लोक मात्रं अजुनही त्याच गोकुळातील कृष्णाच्या गोजिरवाण्या, सुखावह कल्पना उराशी बाळगुन आहोत. बदलत्या परिस्थितीनुसार डोळसपणे आपल्या नैतिकततेही अनुरूप बदल करण्याची वेळ आली आहे. ज्यात आपला, प्राण्यांचा व निसर्गाचाही फायदा आहे अशी नविन नितीमुल्ये अंगिकायला हवी. आपण सर्वांनी हळुहळु करत प्राणिजन्य पदार्थांचा वापर कमी करावा अशी कळकळीची विनंती.

Tuesday, January 15, 2008

ब्लॉग - निरूपण

चार भागात प्रसिद्ध केलेल्या "ब्लॉग" या मालिकेला मी Abstract असे लेबल दिले आहे. खरं म्हणजे हे लिखाण तितकंसं एबस्ट्रॅक्ट म्हणता येणार नाही. अमूर्त, निराकार गोष्टी मूर्त, साकार आहेत अशी कल्पना करून लिहिलेले कल्पित (फिक्शन) लिखाण म्हणता येईल फार तर.
मला याहुन जास्तं abstract लिहायचं आहे. पण जेव्हा जेव्हा मी तसं लिहायचा प्रयत्नं केला तेव्हा तेव्हा "म्हणजे काय?" "समजले नाही" "कोण हे अमुक तमुक"? अशा प्रतिक्रिया मिळाल्या. उदा:
पहाटेस अर्घ्य दे..अंतिम युद्धंचा शेवट इ.

(आता विषयच निघाला आहे तर...
अंतिम युद्धचा शेवट साचेबंद नं केल्याचा एक अनपेक्षित फायदा झाला तो म्हणजे ती कथा
अश्विनीने पुढे लिहायला घेतली. मी कथेचा शेवट जिथे केला तिथेच केला कारण जे सांगायचे होते ते सांगुन झाले होते. कथेच्या शेवटच्या प्रसंगात दोन्ही बाजु समोरा-समोर उभ्या आहेत. दोन्हीपैकी एका बाजुची निवड करण्याची वेळ आलेला केवल मधे उभा आहे.
केवल हा वाचकांचे प्रतिनिधित्व करतो. तिथ पर्यंतच्या कथेमधे त्याची भुमिका ही बहुतांशी श्रोत्याची आहे हे लक्षात घ्यावे. भविष्यात अंतिम युद्धचा शेवट कसा होईल हे वाचकांनी त्यांच्या आजच्या वर्तणुकीवरून ठरवायचे आहे. हे मला अभिप्रेत होते. असो...)
तर कुठे होते मी? हं... म्हणजे Abstract विचार अगदी अवास्तव किंवा काल्पनिकच असतात असे नाही. काही गोष्टी बाह्य संवेदना,जाणिवांच्या बाहेर असतात म्हणुन चटकन उमजत नाहीत एव्ह्ढेच. आधुनिक जीवनामुळे Abstract, non-abstract गोष्टींची अदला बदल झाली आहे,मानवी संवेदनांच्या व्याप्तीमधे तसेच पापुद्र्यांमधे (layers) बदल झाले आहेत.
अणु रेणुंची कल्पना एकेकाळी abstract होती, पण ती कोणी तरी आपल्याला समजावुन सांगितल्याने आता ती abstract राहिलेली नाही.
सातासमुद्रा पलिकडील व्यक्तिला आपण बघु शकतो आणि तिच्याशी संवाद साधु शकतो म्हणजे बघणे आणि ऐकणे या संवेदनांची व्याप्ती मोठी झाली आहे.
ज्यांच्याशी दैनंदिन व्यवहार करायचा ते मित्रं, ऑफिसमधले सहकारी, गिर्‍हाईके, भांडवलदार इ. पैकी काही जण दिसणे या संवेदनेच्या आड गेले आहेत. काही जण तर दिसणे आणि ऐकणे या दोन्ही संवेदनांच्या आड गेलेले आहेत. तरी त्यांच्याशी व्यवहार मात्रं सुरळित सुरू आहेत.
इंटरनेटवरील बाजारात दुकानदार आणि ग्राहक ह्या दोन्हींचे अस्तित्व एकमेकांच्या दृष्टीने abstract झाले आहे. परंतु abstract आहे म्हणजे मिथ्या आहे असे मुळीच नाही.
या पार्श्वभुमीवर abstract विचार अधिक सहजपणे करता यायला हवा असे वाटते. सरावाने ते साध्य होऊ शकते. म्हणुन abstract लिखाण हळुहळु वाढवण्याचा माझा विचार आहे. (आधीच माझे लिखाण, त्यात abstract लिहीणार, म्हणजे आधीच मर्कट सारखे काही तरी...)
गेले जवळपास वर्षभर "मानवकेंद्रितता सोडा" असे पालुपद लावले होते तरीही वाचकांची संख्या व प्रतिसाद दोन्ही वाढतच गेले आहेत. तुमचा लोभ असाच राहिल ही आशा आहे.
वाचकांना लिखाण समजावे ही अर्थातच लेखकाची जबाबदारी आहे. तरीही माझे सर्वच लिखाण बाह्य संवेदनांच्या पातळीवर समजण्यासारखे नसेल हे वाचकांनीही लक्षात ठेवावे. पुढच्या इयत्तेत जायची माझी इच्छा आहे, तुमचा पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे.

Monday, January 14, 2008

ब्लॉग - भाग चार

आता तो एका हमरस्त्याला लागला आहे असे त्याला वाटले. बाजुला बरेच भंगार पडलेले दिसले. त्या वस्तुंकडे जरा नीट बघितले तर काय? त्याने इंटरनेटवरून विकत घेतलेल्या सर्व वस्तु तिथे मोडक्या तोडक्या अवस्थेत पडलेल्या होत्या.


आणखी जरा पुढे आल्यावर त्याला जे काही दिसले त्याने तो ओशाळला... भल्या मोठ्या आकाराचे सिलीकॉनचे मानवी अवयव... सदुला स्वतःचीच लाज वाटु लागली. बायकोला यातले काही कळले तर? अंग चोरत सदु कोपर्‍यात उभा राहिला. सहज त्याची नजर तिथल्या एका चिन्हावर गेली. हे काय? त्याने ते चिन्ह दाबुन पाहिले. एकदा दाबुन काहीच झाले नाही म्हणुन पुन्हा भरभर दोनदा दाबले. पहातो तर काय? इतस्ततः विखुरलेले ते मानवी अवयव रिसायकल बिन मधे जाऊन पडले.

हा हा ss हा हा हाssssहा हा हा हा.... सदुला हसु आले. आता बायको इथे आली तरी हरकत नाही....

अरे पण माझं काय? मला इथुन बाहेर पडायला हवं ना?

सदु पुढे चालु लागला. त्याचा इंटरनेटचा इतिहास त्याच्यासमोर उलगडत होता. तरीही बाहेर पडायचा कुठलाच मार्ग सापडेना. हताश झालेल्या सदुने चिडुन प्रत्येक संकेतस्थळाच्या कोपर्‍यावर जाऊन ते रिसायक बिनमधे टाकायला सुरूवात केली.

असा किती वेळ गेला असेल कोण जाणे... आता त्याचे हात पाय दुखु लागले होते. ती रिसायकल बिनही चांगलीच जड झाली होती. तशाच अवस्थेत तो समग्र मानवी इतिहास या संकेत स्थळावर आला...
थकलेल्या हाताने त्याने चिन्हावर दोनदा मुठ आपटली. तेही संकेतस्थळ रिसायकल बिनमधे जाऊन पडले.

टॉक....सूं-स्स्स्स्स्स...दुढुम.


"अरे सदु, सदु, जेवायला ये ना, किती वेळची हाक मारतेय" बायको आत येताना म्हणाली "तुझं हे तहान भुक विसरून ब्लॉग लिहीणं म्हणजे अगदी कंटाळवाणं झालंय मला.."

अं? ही कोण? सदुने बायकोकडे बघितले....

समाप्तं...नोंद:
आता काय विचारायचं ते विचारा (फक्तं तेव्हढं सोडुन).

Saturday, January 12, 2008

ब्लॉग - भाग तीन

स्वतःच्या ब्लॉगला मागे टाकुन सदु पुढे निघाला.

काही पावले चालल्यावर त्याला एक ओळखीचा आवाज आला... कोणाचा हा आवाज? जरा डोकं खाजवल्यावर लक्षात आलं - मायकल. हो मायकलचाच आवाज तो. मायकल हा त्याचा ऑफिसमधला सहकारी. गेली अनेक वर्षे ते एकाच प्रोजेक्टवर काम करत होते.
"मायकल, मायकल? आर यु देअर?" सदुने जोरात हाक मारली. मायकलचा आवाज आला त्या दिशेने तो धावत सुटला. एका खोलीसारख्या दिसणार्‍या जागेत काही माणसे बसलेली त्याला दिसली. यात मायकल असेल का? इतकी वर्ष एका टीममधे असुनही टोरांटो ऑफिसमधे काम करणार्‍या मायकलला सदुने कधीच बघितले नव्ह्ते. निदान त्याचा फोटोतरी बघायला हवा होता. उशीरा सुचलेल्या या बुद्धिचा आता काहीच उपयोग नव्हता.

"मायकल, आर यु इन देअर ? आय एम स्टक हिअर... प्लीज हेल्प मी" जीवाच्या आकांताने सदु ओरडला, पण घशातुन आवाज अजिबात फुटला नाही.
अचानक मिटींग संपल्यासारखी ती माणसे उठुन सर्व दिशेला पांगली.
सदु वाट सापडेल तिकडे धावत सुटला...
धावता धावता मधेच कशाला तरी अडकुन पडला तो... हे काय? अरे ही टोपली कशाची? आणि हिचा आकार ओळखीचा वाटतोय... माझ्याघरी तर अशी टोपली नाही....ही... ही.... ही... रिसायकल बिन आहे - माझ्या डेस्कटॉपवरची. तेव्हढ्यात कसली तरी गडबड ऐकु आली. काही विचित्रं आवाज आणि आणखी काही आकृत्या. सदु कोपर्‍यात एका आडोशाला जाऊन लपला. एक मोठया आकाराचे रणगाड्यासारखे दिसणारे वाहन कर्कश्श आवाज करत आले. चिर्र चिर्र असा आवाज करत थांबले. त्या वाहनातुन एक मानवी हातासारखा दिसणारा हात बाहेर आला. त्या हाताने रिसायकल बिन उचलुन रणागाड्यात रिकामी केली आणि रिसायकल बिन पुन्हा जमिनीवर भिरकावली.


घरंगळत पायाशी आलेली ती टोपली वेड्यासारखी हातात धरून सदु पुढे चालु लागला...

क्रमशः

Friday, January 11, 2008

ब्लॉग - भाग दोन

ठप्प!


कळफलकातल्या डबक्यातुन फ्लश झालेला सदु जमिनीवर आदळला.


आजुबाजुला भयंकर गोंगाट होता. पण आवाज कुठुन येतोय हे त्याला कळत नव्हतं. मधेच चित्रं विचित्रं आकृत्या तयार होऊन पुन्हा अदृष्य होत होत्या. पुन्हा हातातल्या दोरीकडे त्याने बघितले. त्याच्या आवडत्या गाण्यांचे संकेतस्थळ होते ते. किती वेळा तरी हात झटकुन त्याने ती दोरी सोडायचा प्रयत्न केला. दोरीचे दुसरे टोक कुठे दिसते का ते पहाण्याचाही एक व्यर्थ प्रयत्नं करून बघितला.

अखेर दोरीचे टोक दोन्ही पंजात पकडले आणि सर्व शक्तिनिशी ते ताणुन धरले. शाळेत असताना रस्सीखेच खेळल्याचा फायदा होतो आहे असे त्याला वाटले. लहानपणच्या त्या रस्सीखेचीतल्या सर्व खेळाडु मित्रांचे चेहेरे त्याच्या डोळ्यासमोर तरळले. इंटरनेट नव्हते ना त्यावेळी. मित्रं मैत्रिणींना प्रत्यक्षात बघता येत होतं, त्यांची खरी नावं अडनावं, वडिलांच्या नावासहित माहित असायची. कधी गळ्यात गळे तर कधी गुद्दागुद्दी व्हायची... असे काहीसे विचारही उगीचच त्याच्या मनात येऊन गेले.


तेव्हढ्यात दोरी तुटली आणि तो मागच्या मागे भेलकांडत गेला.


ठक्कं!


त्याची पाठ एका मोठ्ठ्या कॉरिडॉरच्या भिंतीला आदळली.

कॉरिडॉरमधुन चालत काही पावलेच पुढे आला असेल नसेल तेव्हढ्यात काही विकृत आकृत्यांनी त्याला घेरले. भितीने त्याची गाळणच उडाली. ओरडायचा प्रयत्नं केला, पण आवाज काही केल्या फुटेना. या आकृत्या जशा जवळ येऊ लागल्या तसे त्याचे डोळे आधिकच विस्फारले. विदृप,ओबडधोबड असल्या तरी त्या सर्व त्याच्या स्वतःच्याच प्रतिकृती होत्या हे त्याही अवस्थेत त्याच्या लक्षात आले. त्याच्या अगदी जवळ येऊन त्या सर्व आकृत्या त्याच्याच पायाशी ढासळल्या. पायाजवळ त्यांचा भुसभुशीत चुरा जमा झाला. खाली बसुन सदुने तो चुरा न्याहाळला. त्याचा स्वतःचाच ब्लॉग होता तो....


क्रमश:

Thursday, January 10, 2008

ब्लॉग - भाग एक

कट्टं... कट्टं..कट्टं..कटट्टं..कटट्टं...कटट्टं...कटट्टट्ट्ट्ट्ट्ट.....


"छ्या काय झालं या कीबोर्डला अचानक?" सदु पुटपुटला


कटट्टट्ट्ट्ट्ट्ट.....कटट्टट्ट्ट्ट्ट्ट.....टट्टट्ट्ट्ट्ट्ट.....


"च्या xxxxxx. हे काय अडकलं आहे इथे या f च्या बटना खाली? ....xxxx काय भानगड आहे? हे इथे अक्षरासारखं काय अडकुन बसलेलं दिसतंय...अरे बापरे हे काय लांबच्या लांब?"


अचानक-


"उं उं उं ... ओSSSSSSSy ओSSSSSSSय ओSSSSSSSय. xxxxxx हे काय? अगं अगं.. अगं(वरच्या पट्टीत) कुठे आहेस तू? मला वाचव... हा - हा कीबोर्ड मला ओढतोय आत.....आई गं"


झुप्प.


शांतता...


अंगाभोवती गुंडाळलेल्या शब्दांच्या वेटोळ्यातुन त्याने स्वतःची मुक्तता करून घेतली. बुडुक बुडुक बुडुक बुडुक असा आवाज करत ती वेटोळी शद्बांच्या ज्या डबक्यात तो उभा होत्या त्यातच खाली बुडाली.


आत्तापर्यंत त्याने संगणकावर टंकित केलेला शब्दन शब्द साचुन तिथे एक डबके तयार झाले होते. त्याने वर पाहिले. कळफलकाच्या सर्व चाव्या आतल्या बाजुने तो पहिल्यांदाच बघत होता. एक क्षणभर कोणची कळी कोणच्या अक्षराची असेल हा विचार त्याच्या मनात आला. पण लगेच भानावर येऊन कुठुन बाहेर कसे पडता येई ह्याचा विचार तो करू लागला. वरती कीबोर्डच्या छताला हात लावायचा त्याने प्रयत्नं केला, पण हात पोचेना. एव्हाना शब्दांचा तो चिखल हळुहळु गिळगिळीत होतो आहे असे त्याला वाटु लागले. अधिक रुतायच्या आधी इथुन बाहेर पडावे म्हणुन त्यानी उड्या मारत चावीला लटकायचा प्रयत्नं करून पाहिला, पण व्यर्थ. अखेर शब्दांची एक दोरी चिखलातुन उचलुन कीबोर्डला अडकवण्यासाठी वर भिरकावली. हिसके देऊन दोरी दोन तीन वेळा खाली ओढुन पाहिली. त्याबरोबर डबक्यात भोवरे तयार होऊ लागले.

हातातल्या दोरीकडे पुन्हा एकदा त्याने लक्ष केंद्रित केले. दोरी नव्हतीच ती. त्याने भेट दिलेल्या एका संकेतस्थळाचा url होता तो.


घुं....घुं....घुं......घुं घुं घुं घु घुंघुंघुंघुsssssss


डबके फ्लश होऊ लागले. चिखलात गरागरा फिरता फिरता पाय खाली ओढल्याचे त्याला जाणवले....


क्रमश:सुचना:

कृपया "म्हणजे काय?" असा प्रश्न विचारू नये.

रोज एक असे चार भाग लागोपाठ प्रसिद्ध होतील.

थॅंक्स गिव्हिंगची छायाचित्रे (अखेर...)

  • ख्रिसमस आणि नविन वर्ष उलटले तरी मी आमच्या व्हिगन थॅंक्स गिव्हिंगची छायाचित्रे प्रसिद्ध करू शकले नव्हते. छायाचित्रकार एना क्रैसन यांच्या घरी एक दुःखद घटना घडल्याने छायाचित्रे मिळायला उशीर झाला आहे. बेटर लेट दॅन नेव्हर...

    माझ्या कार्यालयातील एक मैत्रिण उत्सुकतेपोटी आमच्या थॅंक्स गिव्हिंगला आली. "असे पदार्थ खायला मिळाले तर व्हेगन व्हायला काहीच हरकत नाही" असे ती का म्हणाली हे तुम्हाला खालील चित्रांवरून कळेल.....

अधिक छायाचित्रे इथे बघा

मेन्यु:
Fall Antipasto Buffet Table

wheatberry-wild rice salad with lavender-blueberry vinaigrette

lentil-brown/wild rice cakes with lemon tahini

cardamom pickled beets

fall lettuces with pumpkin seed-cider dressing

raw vegetables

breads, crustinis, and pita with Egyptian red lentil and artichoke-spinach hummuses, baba ganouj, and Brussels sprout "pâté" marinated olives, spiced pecans, and roasted chestnuts
Main Courses
lime-marinated seared seitan with peppercorns and fig glaze (the "star" of last year's menu)
roasted garlic olive oil mashed potatoes with chives, mushroom gravy, apple-pecan stuffing, and fresh raspberry-cranberry relish
Dilip's macadamia nut blackened Cajun tempeh
Spanish vegetable paella
Shepherd's Pie with wheat gluten, roasted root vegetables, and mushrooms, with a potato crust
braised sweet potatoes with leeks and vegan maple "butter" chutney
roasted green beans with pesto alla Trapanese (almond and tomato pressed sauce)
grilled baby artichokes with rosemary
fall squashes cubed and roasted with yellow beet chunks, cranberry, chestnuts, and dill weed
oyster mushroom croquettes
smoked eggplant stuffed with carmelized onions and yellow lentils
hominy succotash
apple jicama tabouleh (raw dish)
Carpaccio vegetale, which will feature very thinly sliced vegetables as a raw "pasta" (raw dish)
carrot-herb velouté (thickened soup)
Ligurian medallion pasta with marinara sauce and, on the side, walnut vegan "Parmesan cheese"
porcini-lentil cannelloni
country cornbread
Desserts
fresh seasonal fruits
phyllo cookies
pumpkin pie with pomegranate glaze
cinnamon currant apple pie
rhubarb-berry crisp and pastries
Drinks
Cider
Cranberry juice
Herbal tea
Shade-grown coffee


Photographs by:
Anna Creissen

Thursday, January 03, 2008

संशोधन

फाsssssर फाsssssर फाsssssर फाsssssर वर्षांनतरची घटना:
पिल्लु उंदीर: बाबा, आपण माणसांची पुजा का करतो?


बाबा उंदीर: बेटा, कारण ते फार निस्वार्थी होते. त्यांच्यामुळेच आपण आज इतकं चांगलं जीवन जगु शकतो.


पि.उं: बाबा बाबा, निस्वार्थी म्हणजे काय?


बा.उं.: म्हणजे बेटा, जो स्वतःचे शेपुट अडकलेले असतानाही दुसर्‍याचे शेपुट आधी सोडवायचा प्रयत्नं करतो.


पि.उं.:बाबा बाबा, मला माणुस दाखवाल? खरा खरा?


बा.उं.: बेटा, कसं सांगु तुला? फाsssर फाsssर वर्षांपूर्वी खूsssप खूsssप माणसे इथे रहात होती. ती खूsssप हुशार होती. त्या काळातले उंदिर आजच्याइतके हुशार नव्हते. पण त्या दयाळु माणसांना उंदरांची खुप काळजी होती. सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी उंदिरांसाठी अनेक औषधे तयार केली.
मग एकदा एक मोठ्ठा साथीचा रोग आला. त्यावर त्यांनी उंदरांसाठी एक रामबाण औषध बनवले. ते उंदरांना नुसतेच लागु पडले नाही, तर उंदीरांच्या नविन पिढ्या एकदम मोठ्ठ्या आणि हुशार झाल्या. पण दुर्दैवानी माणसांना मात्रं ते औषध लागु पडले नाही....

Tuesday, January 01, 2008

विव्हर स्ट्रिट मार्केट अथवा तत्सम (विअत)

सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

विव्हर स्ट्रिट मार्केटवर लिहिलेल्या या लेखाला वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अशा प्रकारचे पर्याय (विअत) इतर ठिकाणी उपलब्ध आहेत का अशी विचारणा झाली आहे. म्हणुन हा लेख.

विव्हर स्ट्रीटसारखी सहकारी किराणा दुकाने अमेरिकेत बरीच आहेत. (अर्थात विव्हर स्ट्रिट हे सर्वात यशस्वी सहकारी दुकान म्हणावे लागेल. ) अशा दुकांनाना कोऑप किंवा नॅचरल फुड स्टोअर असे म्हणतात. तुमच्या भागात असं एखादं कोऑप आहे का ते शोधायला ही सुची बघा:


http://www.coopdirectory.org/


तुमच्या जवळपास कोऑप नसेल तर इतर पर्याय खाली देते आहे.


होल फुड्स मार्केट: Whole Foods Market ही ऑरगॅनिक किराणा स्टोअर्सची वैशिष्ट्यपूर्ण चेन आहे. ही चेन यशस्वी झाल्यावर इतर किराणा दुकानात ऑरगॅनिक वस्तुंचे विभाग सुरू झाले. (वॉलमार्टनेही लॉबिंग करून "ऑरगॅनिक" शब्दाची व्याख्या बदलवुन घेणे, नियम ढिसाळ करून घेणे असले उपाय करून घेतल्यावर "ऑरगॅनिक" पदार्थे विकायला सुरूवात केली. हल्ली तेही जमले नाही म्हणुन विकणे बंद केल्याचे ऐकले आहे.) होल फुडसची सुपिक कल्पना ज्यांच्या डोक्यातुन निघाली ते संस्थापक व CEO जॉन मॅकी यांच्या संदर्भात तुम्ही ऐकले असण्याची शक्यता आहे. आजकाल CEO च्या पगारपुढची शुन्यांची संख्या वाढत असल्याबद्दल आपण नेहेमीच ऐकतो. जॉन मॅकी यांनी मात्रं गेल्यावर्षीपासून नाममात्रं १ एक डॉलर वार्षिक पगार घ्यायचे ठरवले आहे. त्याशिवाय त्यांना होल फुडसच्या सामान्य कर्मचार्‍यांसारख्याच इतर सुविध, आरोग्य सेवा आदी मिळतात. होलफुडसमधे सद्ध्या प्राणिजन्य पदार्थांची विक्री होते. स्वतः मॅकी मात्रं व्हिगन आहेत.

होलफुडसमधे सॅच्युरेटेड फॅट असलेले तसेच जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थ विकण्यात येत नाहीत. अशी उत्पादने घेण्यासाठी उत्पादकांना व शेतकर्‍यांना अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे रहायचे होलफुडसने ठरवले आहे.

अर्थात होल फुडसमधे जायचे तर जादा पैसे मोजावे लागणार ही मानसिक तयारी करूनच जायला हवे. चांगल्या आरोग्यासाठी केलेली ही गुंतवणुक आहे मी समजते. किटकनाशके फवारलेले, सॅचुरेटेड फॅट असलेले, जेनेटिकली मॉडिफाईड अन्नं खाऊन पुढे तितकेच पैसे औषधांवर खर्च करायची वेळ येऊ शकते.

होल फुडसची दुकाने प्लॅस्टिक बॅगरहित करायचा प्रयत्नं दोन शाखांमधे सुरू आहेत. तो यशस्वी झाल्यास सर्व शाखांमधे फक्तं पुनःप्रक्रिया केलेल्या कागदी पिशव्या ठेवण्यात येतील. ग्राहकांनी घरून आणलेल्या पिशवीमागे पाच ऐवजी दहा सेंटची सुट देण्याचाही विचार सुरू आहे.

एखाद्या कॉर्पोरेशनची जाहिरात करण्याचा माझा उद्देश नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याबद्दल श्रेय द्यायला हरकत नाही असे वाटल्याने इतकी मोठा उतारा होलफुडसवर लिहीला आहे.

होलफुडसपेक्षा आकाराने बर्‍याच लहान इतरही काही चेन्स आहेत: होम इकोनॉमिस्ट(Home Economist), अर्थ फेअर(Earth Fare). त्याशिवाय वाईल्ड ओटस (Wild Oats) या चेनचे नुकतेच होल फुडसमधे विलीनीकरण झाले आहे.


तुमच्या जवळपास एखादे विअत नसेल तर त्यातल्या त्यात जिथे ऑरगॅनिक विभाग मोठा असेल अशा दुकानात जाता येईल. कुठल्याही दुकानात जाताना स्वतःची पिशवी नेण्यासारखे साधे उपाय करून बघा.