Friday, December 15, 2006

इटली - भाग ४ (फिरेंजे फिरेंजे)




१२ ऑक्टोबर २००६
आज आम्ही उफ्फिझी आर्ट गॅलरीची तिकिटे काढली आहेत. शिवाय डुओमोपण आतून बघायचा आहे. आणि उद्या सिएनाला कसे जायचे त्याची पण तयारी करायची आहे. सिएनाला खूप चांगले सर्व्हास होस्ट आहेत, पण काही कारणानी आम्हाला त्यांच्या घरी रहाता येणार नाही. पण ते तिथे आमच्यासाठी एका हॉटेलचे बुकिंग करून ठेवणार आहेत. नवरा त्यांच्याशी संपर्क साधून आहे.
हॉटेलच्या बाहेर पडून आम्ही समोरच्या बार मधे थांबून मग लगेच ट्रेन स्टेशन आणि बस स्टेशनवर एक चक्कर टाकली. गाड्यांची वेळापत्रके बघितली. हॉटेलपासून सामान घेउन चालत जाणे योग्य की टॅक्सी बोलवायची याचा आढावा घेतला. मग पुन्हा चालत डुओमोला पोचलो तेव्हा दहा वाजत आले होते. आत जाण्यासाठी बाहेर लांबच लांब रांग लागली होती. विक्रेते लायनीन उभे राहिलेल्या लोकांना रूमाल, खेळणी, ग्रीटिंग कार्ड इत्यादी विकायचा प्रयत्नं करत होते.

त्या लायनीत उभे राहण्यापेक्षा आधी वरती जाऊन यावे असे ठरवले. मिलानोचा डुओमो बघितल्यामुळे आत जाण्यापेक्षा वर जाण्याचीच मला जास्तं उत्सुकता होती. मग स्वतःकडे फोटो काढायचे काम ठेऊन, नवर्‍याने मला टेहळणीकरून वर जायचा मार्ग शोधून काढायला पिटाळले. नशिबाने वर जायला फारशी रांग नव्हती.
वरती जायला ४६० पायर्‍या आहेत. त्या चढायला सुरुवात केली. अधूनमधून कोरलेल्या झरोकेवजा खिडक्यांमधून बाहेर डोकावता येत होते. एकाला एक चिकटून असलेल्या कौलारू घरांचे शहर दर पायरी गणिक खोलखोल जाताना दिसत होते. दर शंभरेक पायर्‍यांनतर आतल्या बाजूला सज्जे काढले आहेत.


पहिल्या सज्जात पोचलो आणि भिंतीवर काढलेल्या रंगीत चित्रांनी अवाक झालो. अशा चित्रांना फ्रेस्कोज (एक वचन फ्रेस्को) असे म्हणतात. आता जर तुम्हाला शंभर एक फूट वरती चढून, घुमटावर उलटे-सरळ लटकून, चित्रं काढायला सांगितले तर तुम्ही काय कराल? मी तरी एखादं छोटंसं पान किंवा फुल काढून "झालं काम" असं मुकादमाला सांगीन. पण नाही,या डुओमोच्या या कारागीरांनी तसं केलं नाही. उलट चांगली स्वर्ग, नरक, आणि मधले जीवन यांची भली मोठी, प्रभावी चित्रे काढ्न ठेवली आहेत. कुठेही कुचराई झालेली दिसत नाही.

एव्हाना चर्च उघड्ले होते. मघाशी बाहेर रांगेत उभी असलेले सगळे लोक आता आत शिरलेले होते. आम्हाला मात्रं ते अगदी बाहुल्यांसारखे दिसत होते. ते सगळे लोक आत उभे होते तरी चर्चमधे गर्दी झाल्याचे अजिबात वाटत नव्हते, त्यावरून चर्चची भव्यता आणखीनच जाणवली.

तिसर्‍या सज्जावरून खाली बघायला जरा भितीच वाटत होती. अखेर घुमटाच्या खालच्या पायरीपर्यंत पोचलो. घुमटावर जाणार्‍या पायर्‍या उंच आणि अरुंद होत्या. जाणार्‍या येणार्‍यांची झुंबड उडू नये म्हणून उतरण्यासाठी दुसरा मार्ग काढला आहे. वरती पोचलो तेव्हा मंद सुखावह वारा वाहत होता, खाली पसरलेले फिरेंजे चहू बाजूंनी खुणावत होते. सुळ्सुळ्णारा वारा अंगावर घुमटाला प्रदक्षिणा घालुन शहराचे सगळ्या बाजूंनी दर्शन घेतले.
एव्हाना साडे अकरा वाजले होते. खाली उतरून चर्च आतुन बघण्याची औपचारिकता पूर्ण केली. बाहेर आलो तो पर्यंत सव्वा बारा झाले होते. नकाशात बघून उफ्फिझीचा रस्ता शोधून काढत होते. उफ्फिझी गॅलरी सिनोरियाच्या जवळ आहे, आणि सिनोरियाचा रस्ता मला माहित होता, पण ज्या दारातून बाहेर पडलो तिथून त्या रस्त्याला कसे पोचायचे ते नकाशात पाहून चालत चालत शोधत होते. काही मिनिटाने नवरा माझ्या मागे नाही हे लक्षात आले. मागे जाऊन त्याला शोधून काढले. त्याला म्हंटले "तू फोटो काढण्यात इतका मग्नं होतोस की स्थळाचे भान ठेवत नाहीस नी काळाचेही भान ठेवत नाहीस, मला जरा मदत हवी आहे रस्ता सापडवायला." त्यावर केवळ "मी अजून काय काय करत नाही?" असं म्हणून तो पुन्हा शांतपणे फोटो काढू लागला! मी कपाळावर हात मारून घेतला. नकाशात डोकं घालून मी सिनोरियाकडे चालू लागले. नवरा एका डोळ्याने माझ्याकडे नजर ठेवत दुसर्‍या डोळ्याने अव्याहत फोटो काढत होता. मग धावत धावत मला नजरेच्या टप्प्यात आणत होता. अशी लपाछपी खेळत आम्ही साडे बाराच्या सुमारास उफ्फिझीला पोचलो. मी तिकिटाच्या रांगेत उभी राहिले. रिझर्वेशन आधीच झाले होते, तिकिटे हातात घेतली. १ वाजता आम्हाला प्रवेश मिळणार होता त्या वेळात जवळ्च्या बार मधे जाऊन नाश्ता केला.
उफ्फिझी म्हणजे आपले ऑफिस. पूर्वीच्या काळी हे सरकारी कार्यालय होते. आता या इमारतीमधे फिरेंजेच्या प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे (फ्लोरेंटाइन आर्ट) प्रचंड संकलन आहे. आत फोटो काढायला परवानगी नाही (हुश्श!!) बहुतेक चित्रे येशुच्या जिवनावर आधारित आहेत. लिओनार्डोचे एक दालन आहे, मात्रं मोनालिसा तिथे नाही. तिचे स्मितहास्य बघायला रोमाला जायला हवे. बोटिचेलीचे जगप्रसिद्ध बर्थ ऑफ व्हिनस मात्र या प्रदर्शनाची शान आहे. उफ्फिझिचे प्रचंड संकलन नुसते डोळ्याखालून घालायला आम्हाला सहा तास लागले. शेवटी चालून पाय इतके दुखले की मिळेल त्या जागी आधी आम्ही विसावलो. उफ्फिझीची अधिक माहिती इथे पहा - http://en.wikipedia.org/wiki/Uffizi
आज आम्ही केकोच्या स्टुडिओमधे जाऊन मोझेक विकत घेणार होतो. पण आता उशीर झाल्यामुळे उद्या येऊ असा निरोप विक्टोरियाला फोनकरून तिच्या मार्फत कळवला.

थकलो असलो तरी संध्याकाळ्चे साडे सातच वाजले होते. बसनी मिकेलएंजेलो पियाझ्झाला गेलो. पायी चालायची मुळीच इच्छा नव्हती. हा पियाझ्झा एका उंच टेकडीवर आहे. खरं तर इथे सूर्यास्तं बघायला यायचे होते. मिकेलएंजेलोला अर्पण केलेल्या हया पियाझ्झावर डेव्हिड्ची प्रतिकृती ठेवली आहे.

झुळ्झुळ्णारा वारा, वर विस्तीर्ण आकाशातले तारे, खाली पसरलेल्या शहराचे लुकलुकणारे तारे आणि अर्नोमधे पडलेले प्रतिबिंब. फिरेंजेचा सरताज मिकेलेंजेलोच्या स्माराकासाठी ही जागा अगदी त्याच तोडीची आहे. आपल्या कलाक्रूतीने अजरामर झालेल्या त्या कलंदर कलाकाराला अभिवादन करून आम्ही पुन्हा बसमधे बसलो.
आजची रात्रं फिरेंजेतली अखेरची रात्रं. या शहराने खुळावले आहे. जड अतःकरणाने आम्ही सामानाची जमेल तितकी बांधाबांध करू लागलो. इथे बघितलेल्या आणि नं बघितल्या गोष्टी मनात घोळत होत्या - गॅलिलिओचे संकलन बघायचे राहिले आहे - ती एक मोठीच हुरहूर आहे. पुन्हा इथे परत येण्याचा विचार पक्का केला आहे... पण उद्या मुक्काम मात्रं हलणार.....